Sat. May 30th, 2026

संगमनेर, प्रतिनिधी:

कृषी क्षेत्र हे अत्यंत व्यापक असून यामध्ये संशोधनासह आर्थिक समृद्धीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. कृषी क्षेत्रातील नवनवीन माहितीसाठी ‘कळस कृषी प्रदर्शन’ हे संपूर्ण राज्यात लोकप्रिय ठरले असून, अमृतवाहिनीतील या प्रदर्शनाच्या माध्यमातून अद्ययावत तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, असे आवाहन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

शिवछत्रपती प्रतिष्ठान व अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात आयोजित ‘कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाचे’ शानदार उद्घाटन थोरात यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, काँग्रेस नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात, थोरात कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले आणि प्रकल्प प्रमुख सागर वाकचौरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

९ वर्षांपूर्वी कळस येथील युवकांनी कृषी तंत्रज्ञानाची जनजागृती करण्यासाठी सुरू केलेला हा छोटासा प्रयोग आज राज्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणून नावारूपास आला असल्याचा गौरव आमदार थोरात यांनी यावेळी केला.

हे प्रदर्शन भव्य ४० एकर परिसरात पसरले असून त्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे ५ एकर क्षेत्रात विकसित केलेले ६९ पिकांच्या ३५० जातींचे जिवंत प्रात्यक्षिक प्लॉट आहेत. यामध्ये झेंडू, गहू, हरभरा, मका, सोयाबीन, गुलाब आणि कारले यांसारख्या पिकांचा समावेश असून, विशेषतः हॉलंड येथून आणलेले ‘ट्युलिप गार्डन’ यंदा पर्यटकांचे आणि शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेणार आहे.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची नवीन मानसिकता तयार होईल आणि हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ‘तीर्थक्षेत्र’ ठरेल, असा विश्वास डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला.

दुग्ध व्यवसायावर भाष्य करताना रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याला ‘दुधाचा तालुका’ अशी नवी ओळख मिळाली असून, या प्रदर्शनात सहभागी झालेल्या राज्यातील २०० संकरित गाईंचा अभ्यास करणे पशुपालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत उत्साही वातावरणात झाली. महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलाबी साड्या आणि फेटे परिधान करून, लेझीम व टाळ-मृदंगाच्या गजरात काढलेली ‘कृषी दिंडी’ सर्वांचे आकर्षण ठरली. ढोल-ताशांच्या गजरात आणि हवेत फुगे सोडून या कृषी महोत्सवाचा श्रीगणेश झाला असून, हे प्रदर्शन महिला व शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत खुले ठेवण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले, तर आभार सागर वाकचौरे यांनी मानले.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!