संगमनेर:
नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावरून संगमनेर तालुक्यात राजकीय प्रतिक्रियांचे दोन टोकाचे प्रवाह पाहायला मिळत आहेत. आमदार अमोल खताळ यांनी या अर्थसंकल्पाचे ‘महाराष्ट्राच्या प्रगतीला दिशा देणारा’ म्हणून स्वागत केले असतानाच, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याला ‘दिशाहीन आणि सर्वसामान्यांची निराशा करणारा’ अर्थसंकल्प संबोधून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
आमदार अमोल खताळ यांनी अर्थसंकल्पाचे समर्थन करताना सांगितले की, हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने टाकलेले खंबीर पाऊल आहे. यामध्ये बळीराजासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देताना ‘व्हर्च्युअल इंटीग्रेटेड सिस्टम टू एक्सेस अॅग्रीकल्चर रिसोर्स’ या बहुभाषिक एआय (AI) टूलची केलेली तरतूद शेतकऱ्यांसाठी क्रांतीकारक ठरेल.
तसेच कोकणातील नारळ बागायतदार आणि मत्स्योद्योगाला दिलेले बळ ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देणारे आहे. तरुणांच्या भविष्यासाठी १५ हजार शाळांमध्ये ‘कंटेंट क्रिएटर लॅब्स’ आणि गेमिंग-VFX क्षेत्रात २० लाख युवकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करेल. आरोग्य क्षेत्रातील कॅन्सरच्या औषधांच्या किमतीत झालेली कपात आणि सेमीकंडक्टर उद्योगाला दिलेली ४० हजार कोटींची चालना महाराष्ट्राला औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर नेईल, असा विश्वास खताळ यांनी व्यक्त केला. विशेषतः महिलांसाठी ‘She-Marts’ आणि मुलींच्या हॉस्टेलची सुविधा सामाजिकदृष्ट्या दूरगामी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या अर्थसंकल्पावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प देशासमोरील आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर उपाय शोधण्याऐवजी ते प्रश्न अधिक गंभीर करणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गरिबांना कोणताही दिलासा मिळालेला नाही आणि महागाई आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडे कोणतीही ठोस योजना नसल्याचा आरोप थोरात यांनी केला. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याऐवजी केवळ घोषणाबाजीवर भर दिला असून, ठप्प झालेली वेतनवाढ आणि खासगी गुंतवणुकीतील मंदी याकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्याय यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांच्या निधीत कपात करून सरकारने SC, ST, OBC आणि अल्पसंख्याक समुदायांवर अन्याय केल्याचेही त्यांनी सांगितले.
हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ मोठ्या आकड्यांचा खेळ असून, वाढता कर्जबोजा आणि रुपयाची घसरण याकडे दुर्लक्ष करून सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केल्याची घणाघाती टीका थोरात यांनी केली.
एकूणच, आमदार खताळ यांनी या अर्थसंकल्पाला महाराष्ट्राच्या विकासाचा ‘बूस्टर डोस’ मानले असले, तरी बाळासाहेब थोरात यांनी मात्र तो ‘जनहिताचा नसलेला आणि दिशाहीन’ असल्याचे स्पष्ट केले आहे. या परस्परविरोधी प्रतिक्रियांमुळे तालुक्यात अर्थसंकल्पावर राजकीय चर्चा रंगू लागली आहे.
