Sat. May 30th, 2026

महासंगम न्यूज ऑनलाईन

मुंबई:

संगमनेर शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रलंबित प्रश्न आता मार्गी लागला असून शहरात आधुनिक आणि सुसज्ज पोलीस वसाहतीची निर्मिती होणार आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने या प्रकल्पाला अधिकृत मंजुरी मिळाली आहे.

या पार्श्वभूमीवर, आमदार तांबे यांनी मंगळवारी (३ फेब्रुवारी) महाराष्ट्र राज्य पोलीस हाऊसिंग बोर्डाच्या महासंचालक अर्चना त्यागी (IPS) यांची मुंबईत भेट घेऊन प्रकल्पाच्या कामाला गती देण्याबाबत सविस्तर चर्चा केली.

या भेटीदरम्यान, संगमनेरमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना उत्तम दर्जाची निवासस्थाने मिळावीत, यासाठी या वसाहतीचा आराखडा अत्यंत आधुनिक पद्धतीने तयार करण्याच्या सूचना आमदार तांबे यांनी दिल्या. जास्तीत जास्त पोलीस कुटुंबांना या ठिकाणी हक्काची घरे उपलब्ध व्हावीत आणि ही इमारत केवळ सोयीसुविधांनी युक्त न राहता संगमनेर शहराच्या वैभवात भर टाकणारी ठरेल, अशा पद्धतीचे नियोजन करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल आमदार तांबे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. पोलीस दलातील कर्मचारी रात्रंदिवस नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात, त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला चांगल्या वातावरणात राहता यावे ही आपली प्राथमिकता असल्याचे तांबे यांनी नमूद केले.

या वसाहतीचे बांधकाम लवकरच सुरू होणार असून, यामुळे संगमनेरमधील प्रशासकीय पायाभूत सुविधांना मोठी बळकटी मिळणार आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!