Sat. May 30th, 2026

महासंगम न्यूज ऑनलाईन

संगमनेर:

संगमनेर नगर परिषद कार्यालय ते कॅप्टन लक्ष्मी चौक या मुख्य रस्त्याला आता ‘स्वर्गीय धर्मवीर आप्पा केसेकर’ यांचे नाव दिले जाणार असून, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक विश्वासराव मुर्तडक यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

कैलास (आप्पा) केसेकर यांच्या दशक्रिया विधी निमित्त आयोजित श्रद्धांजली सभेत बोलताना विश्वासराव मुर्तडक भावूक झाले होते.

शहराच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व तसेच शिवसेनेचे संगमनेरमधील पहिले नगरसेवक स्वर्गीय धर्मवीर आप्पा केसेकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ संगमनेर नगर परिषदेने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

केसेकर यांनी नगरसेवक म्हणून काम करताना प्रशासनावर असलेली पकड आणि जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण यामुळे सभागृहात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. संगमनेरच्या विकासातील त्यांचे सक्रिय योगदान आणि सामान्यांशी असलेली नाळ लक्षात घेता, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा निर्णय घेण्यात येत असल्याचे मुर्तडक यांनी स्पष्ट केले.

हा रस्ता शहराच्या मुख्य वर्दळीचा भाग असून तो नगर परिषद आणि कॅप्टन लक्ष्मी चौक या दोन महत्त्वाच्या ठिकाणांना जोडतो. विशेष म्हणजे याच रस्त्यावर साळीवाडा भागात केसेकर यांचे निवासस्थान देखील आहे.

या रस्त्याला आप्पांचे नाव मिळाल्यास त्यांच्या कार्याची आठवण शहराच्या हृदयात कायमस्वरूपी कोरली जाईल. यासंबंधीचा अधिकृत ठराव लवकरच संगमनेर नगर परिषदेच्या आगामी सर्वसाधारण सभेत (कौन्सिल) मंजूर केला जाणार आहे.

या निर्णयामुळे शिवसेनेचे पहिले नगरसेवक व ‘धर्मवीर’ म्हणून परिचित असलेल्या आप्पा केसेकर यांच्या स्मृती जतन होणार आहेत. एका खऱ्या लोकप्रतिनिधीचा हा उचित सन्मान ठरणार असल्याची भावना संगमनेरकरांमध्ये व्यक्त होत असून, शहरवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!