महासंगम न्यूज ऑनलाईन:
संगमनेर –
संगमनेर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असलेल्या बसस्थानक परिसरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन विविध समस्यांचे निवेदन सादर केले.
या बैठकीत बसस्थानकाच्या सर्वांगीण विकासावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, मंत्री सरनाईक यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
या भेटीदरम्यान आमदार तांबे यांनी बसस्थानक परिसरात प्रस्तावित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यासाठी वाढीव जागा तातडीने उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली. या स्मारकामुळे शहराच्या सौंदर्यात आणि अस्मितेत मोठी भर पडणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच, बसस्थानक परिसरात होणारे सार्वजनिक कार्यक्रम आणि अनधिकृत फ्लेक्सबाजीमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, याला पायबंद घालण्यासाठी परिवहन विभागाने स्थानिक अधिकाऱ्यांना कडक सूचना द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी लावून धरली.
बसस्थानकातील पार्किंग व्यवस्था आणि वाढते अतिक्रमण या कळीच्या मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा झाली. विमानतळाच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या या वास्तूची नियमित स्वच्छता राखणे आणि पार्किंग सुविधा तातडीने कार्यान्वित करणे आवश्यक असल्याचे तांबे यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
याशिवाय, सामाजिक बांधिलकी जपत अपंग लाभार्थ्यांसाठी आरक्षित असलेले गाळे अद्याप प्रलंबित असल्याने, ते विनाविलंब हस्तांतरित करण्याची मागणी त्यांनी केली. आमदार सत्यजित तांबे यांच्या या नियोजित मास्टरप्लॅनमुळे संगमनेर बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलणार असून प्रवाशांना लवकरच उच्च दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत.
