Sat. May 30th, 2026

शिर्डी:

तीर्थक्षेत्र शिर्डीतील एका नामांकित हॉटेलमध्ये काम करणाऱ्या संगमनेरच्या २२ वर्षीय तरुण कामगाराने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

विशाल रवींद्र वायकर असे या मृत तरुणाचे नाव असून, तो रोजगाराच्या निमित्ताने शिर्डीत वास्तव्यास होता. सोमवारी दुपारच्या सुमारास हॉटेलमधील एका खोलीचा दरवाजा आतून बराच वेळ बंद असल्याने व्यवस्थापनाला संशय आला. वारंवार आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने शिर्डी पोलिसांना पाचारण करण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक सागर काळे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचांच्या उपस्थितीत दरवाजा उघडला असता विशालचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.

घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट मिळून आली नसल्याने आत्महत्येचे गूढ कायम आहे. पोलीस सध्या विशालचा मोबाईल, कॉल रेकॉर्ड्स आणि त्याच्या मित्रांकडे अधिक चौकशी करत असून, मानसिक तणावातून त्याने हे पाऊल उचलले असावे का, याचा शोध घेत आहेत. शिर्डी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!