तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, शनिवारी (दि. ११ ऑक्टोबर) सकाळी १० वाजेच्या सुमारास आनंदवाडी शिवारात एक भीषण अपघात झाला. भरधाव चारचाकी वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन बबन इघे (वय ३१, रा. खडकवाडी, ता. पारनेर) हे त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून लघुशंकेसाठी थांबले होते. त्याच वेळी दत्तात्रेय देवराम गाडगे (वय ४९, रा. लोणी, ता. राहाता) यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आणि हयगयीने चारचाकी वाहन चालवून उभ्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की, दुचाकीस्वार सचिन इघे यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक रावसाहेब बांबळे यांच्यासह पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने गंभीर जखमी इघे यांना रुग्णवाहिकेतून संगमनेरमधील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर मृत घोषित केले.
या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तातडीने अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या मदतीने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुणे-नाशिक महामार्गावरील या सततच्या अपघातांमुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.