महासंगम न्यूज ऑनलाईन
अकोले:
लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी सरकार नसले तरी चालेल, मात्र मुक्त पत्रकारिता नितांत गरजेची आहे. जिथे मुक्त पत्रकारिता नसते, तिथे समाज अंधळा होतो, असे प्रतिपादन ‘न्यूज १८ लोकमत’चे वृत्त संपादक विलास बढे यांनी अकोले येथे केले. अकोले तालुका पत्रकार परिषद आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. किरण लहामटे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक, प्रकाश टाकळकर, प्रा. बाळासाहेब मेहत्रे आणि श्रीनिवास रेणुकादास यांची उपस्थिती होती.

बडे यांनी आपल्या भाषणात पत्रकारितेच्या सत्व आणि नीतिमत्तेवर भर दिला. ते म्हणाले की, आजच्या कसोटीच्या काळात पत्रकारितेचा बुरूज ढासळणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. धमक्या आणि दबावाला न घाबरता पत्रकारांनी सत्याची बाजू मांडली पाहिजे. जर समाजात पत्रकारांबद्दल आदराऐवजी ‘पाकिटावर खरेदी होतात’ अशी भावना निर्माण होत असेल, तर ती लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. पत्रकारांनी सामान्य माणसाशी आपले नाते कायम ठेवल्यास पत्रकारितेची विश्वासार्हता नक्कीच वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात मधुकरराव नवले यांनी नमूद केले की, समाजात शहाणपण पेरण्याची जबाबदारी पत्रकारांची असून त्यांनी विकासाच्या प्रक्रियेत योगदान द्यावे. आमदार डॉ. किरण लहामटे यांनी पत्रकार हा विकासाचा महत्त्वाचा घटक असून ते समाजाच्या प्रश्नांची वकिली करतात, असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील दिगंबर कावळे आणि आदित्य बिर्ला समूहाचे किशोर चाटे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे स्वागत ज्येष्ठ पत्रकार श्रीनिवास रेणुकादास यांनी केले, तर प्रास्ताविक अमोल वैद्य यांनी मांडले. पाहुण्यांचा परिचय ज्येष्ठ पत्रकार संदीप वाकचौरे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश आरोटे व चंद्रशेखर हासे यांनी केले आणि आभार रमेश खरबस यांनी मानले.
