महासंगम न्यूज ऑनलाईन
संगमनेर :
छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनिकेत घुले यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा येत्या बुधवारी, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. संगमनेर येथील बी.एस.टी. कॉलेजमधील के.बी. दादा देशमुख सभागृहात सायंकाळी ५ वाजता हा गौरव सोहळा संपन्न होईल.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार डॉ. सुधीर तांबे भूषविणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विभागाचे माजी शिक्षक आमदार कपिल पाटील, राष्ट्र सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष राजा कांदळकर आणि छात्र भारतीचे मावळते प्रदेशाध्यक्ष रोहित ढाले उपस्थित राहणार आहेत.
छात्र भारती, राष्ट्र सेवा दल आणि जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात अनिकेत घुले यांच्यासह संघटनेच्या नवनिर्वाचित इतर राज्य पदाधिकाऱ्यांचाही विशेष सन्मान केला जाणार आहे.

विद्यार्थी चळवळीतील योगदानाची दखल घेण्यासाठी आयोजित या कार्यक्रमास राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर एकाच व्यासपीठावर येणार आहेत. संगमनेर परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
