संगमनेर:
तमाशा ही महाराष्ट्राची जिवंत लोककला असून, या क्षेत्रात आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या रघुवीर खेडकर यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर राज्यभरातील तमाम लोककलावंतांचा सन्मान आहे, असे गौरवपूर्ण उद्गार माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल संगमनेर येथील कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे खेडकर यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी ते बोलत होते.
या ऐतिहासिक सोहळ्याला ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, प्रसिद्ध उद्योगपती राजेश मालपाणी, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह अनेक मान्यवर आणि खेडकर कुटुंबीय उपस्थित होते.


बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, संगमनेरच्या भूमीला कवी अनंत फंदींपासून ते गुलाबबाई संगमनेरकर यांच्यापर्यंत मोठी कला परंपरा लाभली आहे. स्वातंत्र्यलढा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोककलावंतांचे योगदान मोलाचे राहिले आहे. कोरोनासारख्या कठीण काळातही खेडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांची साथ न सोडता ही कला जिवंत ठेवली, याचा संगमनेरकरांना सार्थ अभिमान आहे.
सत्काराला उत्तर देताना पद्मश्री रघुवीर खेडकर अत्यंत भावूक झाले होते. संगमनेर ही आपली कर्मभूमी असून या मातीने आपल्याला जगण्याचे संस्कार दिले आहेत, अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. “संगमनेर हीच माझी आई आणि बाप आहे,” असे म्हणत त्यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून सुरू झालेला आपला संघर्षमय प्रवास आठवला.
हा सोहळा पाहताना आईची उणीव भासत असल्याचे सांगताच त्यांचे डोळे पाणावले. यावेळी खेडकर यांनी व्यासपीठावरून खाली उतरून प्रेक्षकांना घातलेला दंडवत उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला.
कार्यक्रमात डॉ. रावसाहेब कसबे यांनी तमाशा कलावंतांसाठी सरकारी अनुदानाची मागणी केली, तर आमदार सत्यजित तांबे यांनी या पुरस्कारामुळे नव्या पिढीतील कलावंतांना प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला खेडकर यांचे पुष्पवृष्टी आणि शिस्तबद्ध परेडने स्वागत करण्यात आले.
