अहिल्यानगर:
अहिल्यानगर जिल्ह्याचा मोठा भौगोलिक विस्तार आणि प्रशासकीय कामाचा ताण विचारात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्याचे विभाजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता जिल्ह्यासाठी अहिल्यानगर आणि शिर्डी अशी दोन स्वतंत्र अधीक्षक कार्यालये कार्यान्वित करण्यात आली असून शिर्डीच्या पहिल्या अधीक्षकपदी ऋषिकेश इंगळे यांची नियुक्ती झाली आहे.


अहिल्यानगर कार्यालयाची जबाबदारी अधीक्षक सोनोणे यांच्याकडे कायम असून त्यांच्या अंतर्गत अहिल्यानगर शहर, जामखेड, कर्जत, श्रीगोंदे, पारनेर, पाथर्डी आणि शेवगाव या तालुक्यांचा समावेश असेल. तर नवनियुक्त शिर्डी कार्यालयाकडे नेवासे, श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, राहुरी, संगमनेर आणि अकोले या सात तालुक्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शिर्डी कार्यालयासाठी १७ पदे मंजूर करण्यात आली असून त्यात स्वतंत्र भरारी पथकाचाही समावेश आहे. पोलीस, महसूल आणि परिवहन विभागानंतर आता उत्पादन शुल्क विभागानेही विकेंद्रीकरणाचे हे पाऊल उचलल्यामुळे गुन्हे नियंत्रण आणि महसूल वसुलीच्या कामात मोठी सुसूत्रता येणार आहे.
