Sat. May 30th, 2026

संगमनेर –संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथील नववीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या प्रगती सखाराम श्रीराम या विद्यार्थिनीवर बिबट्याने हल्ला करण्याचे घटना शनिवारी सकाळी घडली होती. बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीवर रुग्णालयात उपचार सुरू असून शनिवारी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयात जात तिच्या तब्येतीची विचारपूस करत तिला धीर दिला.

जखमी विद्यार्थिनीवर संगमनेरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. दौरा संपवून थोरात संगमनेर मध्ये आल्यानंतर त्यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थिनीची भेट घेत तिच्याबरोबर, आमचे पालक व मामा देवराम खेमनर यांच्यासोबत त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी खेमनर यांच्या धाडसाचे कौतुक केले.

डिग्रस येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिकणारी प्रगती सकाळी शाळेत जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये प्रगती गंभीर जखमी झाली. पाठोपाठ येत असलेले प्रगतीचे मामा देवराम खेमनर यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट मोटरसायकल शेतामध्ये घातली. हॉर्न वाजून मोठा आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने प्रगतीला सोडून पळ काढला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये प्रगतीच्या मानेला मोठ्या जखमा झाल्या आहेत. ही बातमी कळताच डिग्रस व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

थोरात म्हणाले, सध्या बिबट्यांचे वाढते हल्ले हे अत्यंत चिंताजनक आहे. बिबटे मानवी वस्तीत शिरत असून वन विभागाने यावर अत्यंत प्रभावी उपाय योजना करण्याचे गरजेचे आहे. याबाबत आपण वनमंत्र्यांशी बोलणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी उपस्थित ग्रामस्थ व पालक यांनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!