Sat. May 30th, 2026

संगमनेर:

श्रीरामपूर आरटीओ कार्यालयातील अधिकारी ‘मार्च एंडिंग’चे टार्गेट पूर्ण करण्यासाठी किरकोळ कारणांवरून ४ ते ८ हजार रुपयांपर्यंत अवाढव्य दंड आकारून गरिबांच्या तोंडचा घास हिरावत असल्याचा आरोप करत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित ‘वाहतूक सेना’ आणि ‘रिक्षा सेने’च्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या अन्यायकारक दंडवसुलीविरोधात १ मार्चपासून संगमनेर शहर व तालुक्यात ‘रिक्षा बंद’ करण्याचा निर्धार रिक्षाचालकांनी व्यक्त केला असून, ही दंडवसुली न थांबल्यास शहर पोलीस स्टेशन येथे ‘ठिय्या आंदोलन’ छेडले जाईल, असा इशारा तालुकाप्रमुख अशोक बढे यांनी दिला आहे.

वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख इम्तियाज शेख आणि तालुकाप्रमुख अशोक बढे यांनी प्रशासनावर खळबळजनक आरोप केले आहेत. आरटीओ अधिकारी ४ हजार रुपयांचा दंड सांगून प्रत्यक्षात एजंटमार्फत कोणतीही पावती न देता ८ ते १० हजार रुपये लाच स्वरूपात उकळत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. रिक्षाचालकांचे मासिक उत्पन्न अवघे १५ हजार रुपये असताना, एका महिन्याच्या कमाईपेक्षा जास्त दंड आकारणे ही ‘हुकूमशाही’ असल्याची भावना व्यक्त होत आहे. गाडीचे पासिंग नसणे, अतिरिक्त प्रवासी किंवा पीयूसी/एनओसी नसल्यास ताकीद देण्याऐवजी थेट रिक्षा जप्त केल्या जात असल्याने चालकांमध्ये तीव्र संताप आहे.

या आंदोलनासाठी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अपक्ष आमदार सत्यजित तांबे आणि आमदार अमोल खताळ यांची भेट घेऊन निवेदन दिले. दोन्ही आमदारांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे. तसेच पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली. हे आंदोलन जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील आणि उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी जिल्हाप्रमुख (वाहतूक सेना) इम्तियाज शेख, शहरप्रमुख फैसल शेख, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, शहरप्रमुख अमित चव्हाण, आश्वी ग्रामीण तालुकाप्रमुख प्रकाश गायकवाड, उपजिल्हा संघटक रंगनाथ फटांगरे आणि भीमाशंकर पावसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी उपतालुकाप्रमुख संजय सोनवणे, दत्तू नाईक, रवींद्र गिरी, व्यापारी आघाडीचे शहर प्रमुख संभव लोढा, अमोल डुकरे, शानू शेख, रफिक शेख, महमूद सय्यद, परवेज शेख, रहीम बेग, दीपक वनम, माघाडे यांच्यासह रिक्षा सेना आणि रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विषय गंभीर तेथे ठाकरेंचे शिवसैनिक खंबीर असा नारा देत या अन्यायाविरुद्ध लढा तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!