संगमनेर:
मुंबई येथे पार पडलेल्या छात्र भारतीच्या ४२ व्या राज्य अधिवेशनात संगमनेरचे सुपुत्र अनिकेत घुले यांची संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीचे औचित्य साधून संगमनेरमधील राष्ट्रसेवा दल, छात्र भारती, जयहिंद लोक चळवळ तसेच विविध सामाजिक, राजकीय व पुरोगामी संघटनांच्या वतीने के. बी. दादा देशमुख सभागृहात अनिकेत घुले यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. तांबे यांनी राष्ट्र सेवा दल आणि छात्र भारती या संघटना पुरोगामी विचार आणि भक्कम वैचारिक अधिष्ठान असणारी नवी पिढी घडवत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
राष्ट्र सेवा दलाचे नेते सीताराम राऊत यांनी छात्र भारती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने लढा देत असल्याचा गौरव केला. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षा रुपवते यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले, तर शिक्षक नेते हिरालाल पगडाल यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य करत विवेकी आणि पुरोगामी विचारांच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन केले.
आपल्या सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त राज्य अध्यक्ष अनिकेत घुले म्हणाले की, छात्र भारती ही गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी महाराष्ट्रभर लढणारी संघटना आहे. शिक्षणाच्या वाढत्या बाजारीकरणामुळे विद्यार्थ्यांसमोर मोठी आव्हाने उभी असून, छात्र भारती कोणत्याही दबावाला बळी न पडता विद्यार्थी हितासाठी जोमाने काम करत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या सोहळ्याला राष्ट्रसेवा दलाचे राज्य अध्यक्ष राजा कांदळकर, नगराध्यक्ष मैथिलीताई तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, कॉम्रेड कारभारी उगले, छात्रभारतीचे माजी अध्यक्ष रोहित ढाले, समीर लामखडे, संदीप काकड, राम चन्ना, मोहम्मद कैफ, राजाभाऊ अवसक, रंजना गवादे, उल्हास पाटील, अजय फटांगरे, चंद्रकांत घुले, रवी दिवे, अनुराधा आहेर, राहुल जऱ्हाड यांसह विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी छात्रभारतीच्या इतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.
