Sat. May 30th, 2026

संगमनेर:

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान पालकमंत्र्यांच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पालकमंत्र्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन नेमका कोणता नकाशा सुचविला आणि कोणता मार्ग प्रस्तावित केला, हे त्यांनी जनतेसमोर स्पष्ट करावे, अशी आग्रही मागणी थोरात यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पाला गती मिळाली होती आणि नाशिक-सिन्नर-संगमनेर-राजगुरुनगर-पुणे असा सरळ मार्ग तांत्रिक तपासणीनंतरच निश्चित झाला होता. त्यावेळी मंत्रिमंडळाची मान्यता मिळून भूसंपादनासाठी साडेतीनशे कोटींचे वाटपही सुरू झाले होते, याची आठवण थोरात यांनी करून दिली. मात्र, आता सत्तांतर झाल्यानंतर अचानक जीएमआरटीचे कारण पुढे करून मार्ग बदलण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्यामागे नेमका काय हेतू आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सध्या या प्रकल्पासाठी शिर्डीमार्गे जाणाऱ्या तिसऱ्या पर्यायाची चर्चा होत असल्याने संगमनेर आणि अकोले पट्ट्यातील जनतेमध्ये संभ्रम आहे. हा प्रकल्प नाशिक, पुणे आणि मुंबई या ‘गोल्डन ट्रँगल’च्या विकासासाठी आणि पुढील शंभर वर्षांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे सरळ मार्गाऐवजी ‘वाकडी वाट’ धरल्यास ते विकासाला परवडणारे नाही. संगमनेरची रेल्वे हा येथील जनतेच्या अस्मितेचा विषय असून मार्गाबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!