Sat. May 30th, 2026

संगमनेर:

तालुक्यातील सावरगाव तळ, चंदनापुरी, हिवरगाव पावसा आणि झोळे या गावांना भविष्यात पाण्यापासून वंचित ठेवले जाणार नाही. तळेगाव निमोण आणि साकुर पठार भागाप्रमाणेच या गावांचा पाण्याचा प्रश्न उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून मार्गी लावला जाईल. या भागाला पाणी देण्याची जबाबदारी आम्ही घेतली असून दिलेला शब्द नक्कीच पूर्ण करू, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे.

सावरगाव तळ येथे ५ कोटी ७१ लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी आमदार खताळ बोलत होते. यावेळी त्यांनी नूतन ग्रामपंचायत इमारत, सभामंडप, व्यायामशाळा साहित्य, म्हसोबा महाराज मंदिर रस्ता दुरुस्ती, जिल्हा परिषद शाळा व प्रवरा माध्यमिक विद्यालय परिसर तसेच गावठाणात सोलर हायमास्ट दिवे बसवणे, स्मशानभूमी सुशोभीकरण आणि पिंपळगाव माथा-सावरगाव तळ-चंदनापुरी रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण अशा महत्त्वपूर्ण कामांचा प्रारंभ केला. या कार्यक्रमाला महायुतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार खताळ पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत दिलेला पाण्याचा शब्द पाळण्याची संधी आता मिळाली आहे. निळवंडे उजव्या कालव्यावरून उपसा जलसिंचन योजनेद्वारे या भागाला पाणी मिळणार असल्याने नागरिकांनी काळजी करू नये. माजी मंत्री स्व. बी. जे. खताळ पाटील यांनी सुरू केलेल्या परंतु मध्यंतरी अपूर्ण राहिलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.

अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याला मिळाला आहे. काही लोक सर्व निधी आम्हीच आणल्याचा दावा करत आहेत, मात्र त्यांच्या या टीकेला आपण विकासकामांतूनच उत्तर देत आहोत. जर सर्व निधी त्यांनीच आणला होता, तर गेल्या ४० वर्षांत ही कामे का पूर्ण करता आली नाहीत, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!