संगमनेर:
तालुक्यातील निमगावजाळी येथील २८ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
माधुरी मनोज अरगडे असे मृत विवाहितेचे नाव असून, औरंगपूर शिवारातील एका शेततळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. गेल्या १० वर्षांपूर्वी त्यांचा विवाह मनोज अरगडे यांच्याशी झाला होता, मात्र लग्नानंतर काही काळानंतर पती आणि सासू मीराबाई अरगडे यांनी किरकोळ कारणावरून माधुरीला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती.


वारंवार होणारी मारहाण आणि शिवीगाळीमुळे माधुरी आपल्या शिवांश आणि विरांश या दोन मुलांसह माहेरी अंभोरे येथे निघून गेल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच नातेवाइकांच्या मध्यस्थीने त्या पुन्हा सासरी परतल्या होत्या, मात्र ७ फेब्रुवारी रोजी त्या अचानक बेपत्ता झाल्या. अखेर गुरुवारी दुपारी त्यांचा मृतदेह शेततळ्यात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी मयत विवाहितेचे वडील बाळासाहेब रंगनाथ कोटकर यांच्या तक्रारीवरून आश्वी पोलिसांनी पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
