सिन्नर:
तालुक्यातील नळवाडी येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पातळेश्वर गंगा आश्रम महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
यानिमित्त पंचक्रोशीतील हजारो भाविकांसह नाशिक, पुणे आणि मुंबई येथून गावी आलेल्या नोकरदार वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. या यात्रेचे औचित्य साधून ‘आपुलकी फाउंडेशन’ या सेवाभावी संस्थेच्या वतीने भव्य मोफत सर्व रोगनिदान आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात परिसरातील अनेक गोरगरीब आणि गरजू रुग्णांसह ज्येष्ठ नागरिकांनी व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. संगमनेर येथील देशमुख मल्टीस्पेशालिटी नेत्र विभाग आणि मेडिकवर हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी यावेळी रुग्णांची तपासणी केली. यामध्ये प्रामुख्याने डोळ्यांच्या समस्या, मोतीबिंदू, मुलांमधील तिरळेपणा, बीपी, शुगर, ईसीजी तसेच गुडघेदुखी, हातपाय दुखणे आणि मेंदूच्या आजारांवर मोफत मार्गदर्शन व उपचार उपलब्ध करून देण्यात आले. समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडण्याच्या हेतूने तरुण युवकांनी या प्रसंगी मोठ्या उत्साहात रक्तदान केले, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आपुलकी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपकशेठ वर्पे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हे शिबीर यशस्वीरीत्या पार पडले. याप्रसंगी पातळेश्वर देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी तसेच आपुलकी फाउंडेशनच्या सचिव स्वाती वर्पे, उपाध्यक्ष सोमनाथ आहेर, सतीश आंबरे, शुभम हासे, संदीप सहाणे, संतोष वर्पे, निलेश मोरे, सदाशिव सहाणे, बाळासाहेब देशमुख आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग्य उपचार आणि मार्गदर्शनामुळे अनेक रुग्णांनी समाधान व्यक्त केले असून फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

