संगमनेर :
शहरातील अवैध कत्तलखान्याचे कंबरडे मोडण्यासाठी आज संगमनेर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली. गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाच्या रडारवर असलेल्या तब्बल १४ अनधिकृत कत्तलखान्यांवर आज प्रशासनाचा हातोडा पडला असून, या हातोडा मोहिमेमुळे अवैध कत्तलखाना चालकांचे धाबे दणाणले आहेत.
आज (मंगळवारी १६ फेब्रुवारी) सकाळी १० वाजल्यापासूनच शहरात मोठ्या फौजफाट्याची हालचाल सुरू झाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि पालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली हा ऑपरेशन प्लॅन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यात आला. या मोहिमेत पालिकेचे ५० कर्मचारी व मजूर आणि पोलीस दलाचे ५० अधिकारी व अंमलदार असा एकूण १०० जणांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


प्रशासनाने शहरातील भारत नगर, जमजम कॉलणी, मदीना नगर आणि रमाई उद्यान परिसर या संवेदनशील भागांमध्ये एकाच वेळी कारवाईला सुरुवात केली. दोन जेसीबी, तीन ट्रॅक्टर आणि कटर मशीन्सच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामे, लोखंडी सांगाडे आणि पत्रे कापून काढण्यात आले. दुपारपर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेत सर्व १४ अवैध बांधकामे पूर्णपणे भुईसपाट करण्यात आली.
या मोहिमेत संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक फराहनाज पटेल, उपनिरीक्षक फडोळ, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, आरोग्य अधिकारी अमजद पठाण यांच्यासह महेश गोर्डे, जुन्नरे, मावळकर, साजीद पटेल, अल्ताफ शेख, जयराम मंडलिक व इतर कर्मचारी व पोलीस पथकाने सक्रिय सहभाग नोंदवला.
शहरात कोणत्याही प्रकारचे अनधिकृत व्यवसाय किंवा अवैध बांधकामे सहन केली जाणार नाहीत, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे आणि शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिला आहे.
