Sat. May 30th, 2026

गणोरे (प्रतिनिधी):

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि भावी पिढी सुजाण नागरिक म्हणून घडावी या उदात्त हेतूने, पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा गणोरे येथे कवी कुसुमाग्रज वाचन प्रेरणा अभियान मोठ्या उत्साहात संपन्न झाले. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनंत भंडारी यांच्या संकल्पनेतून आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम अकोले तालुक्यातील गणोरे येथे राबविण्यात आला.

अभियानाचा प्रारंभ कुसुमाग्रज वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळेपासून संपूर्ण गणोरे गावामध्ये काढण्यात आलेल्या आकर्षक ग्रंथदिंडीने झाला. या फेरीत विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. ग्रंथदिंडीनंतर शाळेच्या आवारात मान्यवर, पालक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘बाल ग्रंथालयाचे’ उद्घाटन अत्यंत थाटात पार पडले. बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी आणि सध्याच्या डिजिटल युगात मुलांचा वाढता मोबाईल व स्क्रीन टाईम कमी व्हावा, या उद्देशाने हे ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे.

याप्रसंगी बोलताना प्राचार्य सुशांत आरोटे यांनी विश्वास व्यक्त केला की, या ग्रंथालयामुळे आणि शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे विचारांनी समृद्ध अशी नवीन पिढी तयार होईल, जी देशाचे जबाबदार नागरिक म्हणून नावारूपास येईल. कार्यक्रमाचे दुसरे वक्ते श्री. भाऊसाहेब आंबरे यांनी आपल्या मनोगतातून गाव, शाळा आणि विद्यार्थी यांच्या विकासासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. आपली भविष्यातील पिढी घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन समाजासमोर एक नवा आदर्श ठेवावा, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या विशेष कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री. अशोक गंगाधर आहेर यांनी भूषवले. यावेळी व्यासपीठावर सुनील आहेर, अमृतसागर दूध संघाचे संचालक श्री. रामदास आंब्रे, राजेंद्र आंबरे, दत्तात्रय आंबरे, भाऊसाहेब चव्हाण, संजय वाघचौरे आणि विकास खातोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विश्वस्त निलेश आंबरे, विश्वस्त किरण आहेर, तज्ञ संचालक प्रवीण मालुंजकर, सौ. छाया आहेर, पोपट आहेर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ आंब्रे आणि उपाध्यक्ष दत्तात्रय आहेर यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. नेहरकर सर यांच्या नियोजनाखाली सर्व शिक्षक, शिक्षिका, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन संजय कुमार नवले यांनी केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक नेहरकर सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!