Sat. May 30th, 2026

अकोले:

अकोले नगरपंचायतीच्या कारभारातील कथित गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आजपासून नगरपंचायत कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. नगरपंचायतीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी अधिकाराचा गैरवापर करून खोटे ठराव आणि प्रोसिडिंग केल्याचा गंभीर आरोप उपोषणकर्त्यांनी केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० मे २०२५ रोजी झालेल्या सभेतील ठरावांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आणि १४ ऑक्टोबर २०२५ रोजी स्थायी समितीची कोणतीही सभा झालेली नसतानाही सभेचे खोटे कामकाज दाखवून निविदा प्रक्रिया राबवल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, शासनाकडून प्राप्त झालेल्या ४० लाख रुपयांच्या रस्ते अनुदानाच्या पत्रावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

या उपोषणामध्ये सोनाली नाईकवाडी, सागर निवृत्ती चौधरी, नवनाथ शेटे, आरिफ शेख, श्वेताली रूपवते, तमन्ना मोहसीन शेख, जनाबाई नवनाथ मोहिते आणि माधुरी रवींद्र शेणकर हे सहभागी झाले आहेत. उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे फलक लावून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. यामध्ये प्रामुख्याने खोटे ठराव रद्द करणे, अध्यक्ष व उपाध्यक्षांनी केलेले करारनामे रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे, नगरपंचायतीचे खासगीकरण थांबवणे आणि विद्यमान कार्यकाळातील संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी करणे या मागण्यांचा समावेश आहे.

नगरपंचायतीच्या या कथित ‘कागदोपत्री’ कारभारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. जोपर्यंत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. या आंदोलनामुळे नगरपंचायत प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून, आता प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण अकोले शहराचे लक्ष लागले आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!