Sat. May 30th, 2026

संगमनेर:

राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या सरकारी मराठी शाळा बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात छात्र भारती विद्यार्थी संघटनेने संगमनेरमध्ये आक्रमक पवित्रा घेतला आहे.

शनिवारी संघटनेच्या वतीने संगमनेर बसस्थानक परिसर आणि प्रांत अधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून शासनाचा तीव्र निषेध करण्यात आला. या आंदोलनानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांना पाठवण्यात आले.

विधानसभेच्या अधिवेशनात शालेय शिक्षण मंत्र्यांनी राज्यातील २५८ शाळा बंद करण्याबाबत माहिती दिल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सरकारी शाळांमध्ये प्रामुख्याने गोरगरीब, दलित, आदिवासी आणि वंचित समाजघटकातील मुले शिक्षण घेतात. खासगी शिक्षणाचा खर्च सामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेर असताना सरकारी शाळा बंद करणे म्हणजे या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर ढकलण्यासारखा अन्यायकारक प्रकार असल्याची टीका आंदोलकांनी केली आहे. ग्रामीण भागातील शाळांचे सक्षमीकरण करण्याऐवजी त्या थेट बंद करणे हा पर्याय चुकीचा असून, सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

या आंदोलनाचे नेतृत्व छात्र भारतीचे राज्याध्यक्ष अनिकेत घुले आणि राज्य संघटक विशाल शिंदे यांनी केले. यावेळी संगमनेर अध्यक्ष मोहम्मद तांबोळी, यश सानप, साई वर्पे, ऋतिक जोंधळे, सोहम घुले, अनिकेत खरात, अभिषेक वैराळ, मसिरा तांबोळी, वैष्णवी सोनुले, पायल कानवडे, भरत सोनवणे, किरण मेढे, अपेक्षा हांडे, अनुष्का खरात, आकांशा जमधडे, प्रणाली फटांगरे, आरती क्षीरसागर, स्नेहा शिरसाठ, सुरज पवार, मयूर घुले, दत्ता ढगे, रजत अवसक आणि राम अरगडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!