संगमनेर:
सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत महापुरुषांच्या विचारांची प्रासंगिकता तपासून पाहण्यासाठी संगमनेरमध्ये एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘गांधी, नेहरू का नकोत?’ या महत्त्वपूर्ण विषयावर दैनिक लोकमत समूहाचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे येत्या रविवारी आपले परखड विचार मांडणार आहेत.
सत्यशोधक विचारमंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेतील हे दुसरे पुष्प असून, हा कार्यक्रम २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता संगमनेरमधील पडतानी कॉम्प्लेक्स येथील व्यापारी असोसिएशन हॉलमध्ये संपन्न होईल. या कार्यक्रमाचे सौजन्य संगमनेर लोकपंचायतने स्वीकारले आहे.


संजय आवटे हे त्यांच्या अभ्यासू मांडणीसाठी आणि सडेतोड विश्लेषणासाठी ओळखले जातात. ‘गांधी-नेहरू’ यांच्याबद्दल आजच्या काळात मांडल्या जाणाऱ्या विविध भूमिकांच्या पार्श्वभूमीवर ते काय भाष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रबोधनात्मक व्याख्यानाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सत्यशोधक विचारमंचाच्या वतीने करण्यात आले आहे.
