Sat. May 30th, 2026

महासंगम न्यूज ऑनलाईन

संगमनेर: पर्यावरण संवर्धन आणि निसर्ग रक्षणाच्या चळवळीत संगमनेर तालुक्यातील खांडगाव ग्रामपंचायतीने राज्याच्या नकाशावर आपली मोहोर उमटवली आहे. राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ अंतर्गत २,५०० ते ५,००० लोकसंख्या गटात खांडगावने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले असून, या यशाबद्दल गावाला राज्यस्तरीय पुरस्कार आणि ५० लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये या विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते खांडगावच्या पदाधिकाऱ्यांनी हा बहुमान स्वीकारला. खांडगावने राबविलेले विविध पर्यावरणपूरक उपक्रम, सांडपाणी व्यवस्थापन, वृक्षारोपण आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळेच हा ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला आहे.

या यशामागे सरपंच ॲड. विकास रावसाहेब गुंजाळ आणि उपसरपंच सुनील लक्ष्मण रुपवते यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे नियोजन महत्त्वाचे ठरले. मार्गदर्शक सोमनाथ नबाजी गुंजाळ, भरत भीमाशंकर गुंजाळ, लक्ष्मीबाई संपत गुंजाळ, रमेश विश्वनाथ अरगडे, गंगाताई प्रभाकर गुंजाळ, पद्मावती संजय गुंजाळ, अनिता आप्पासाहेब गुंजाळ, शोभा लक्ष्मण खरे आणि नयना विलास गुंजाळ या सर्वांनी या अभियानासाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच प्रशासकीय पातळीवर ग्रामसेविका उज्ज्वला नवले आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केलेल्या अचूक नियोजनामुळे खांडगावचा डंका राज्यस्तरावर वाजू शकला.

खांडगावच्या या दैदीप्यमान यशाची दखल राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही घेतली असून, त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांचे विशेष कौतुक करत पुढील विकासकामांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या पुरस्कारामुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यात खांडगावचे नाव अभिमानाने घेतले जात आहे. हा पुरस्कार गावातील प्रत्येक ग्रामस्थाचा, स्वच्छता सैनिकाचा आणि पर्यावरणासाठी झटणाऱ्या प्रत्येक हाताचा सन्मान असल्याचे सरपंच ॲड. विकास गुंजाळ यांनी यावेळी नमूद केले.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!