संगमनेर:
शहराच्या सर्वांगीण जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या दिवंगत लोकनेत्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांना त्यांची नावे देण्यात यावीत, अशी मागणी शिवसेना महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना सविस्तर निवेदन दिले.
या निवेदनाद्वारे स्व. राधावल्लभ कासट, स्व. कुंदनसिंग परदेशी आणि स्व. कैलास (आप्पा) केसेकर या तिन्ही नेत्यांनी संगमनेरच्या सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी आणि सार्वजनिक क्षेत्राच्या विकासात बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेची आठवण करून देण्यात आली आहे. या नेत्यांनी राबवलेले विविध उपक्रम आणि त्यांच्या सामाजिक कार्याचा ठसा आजही जनमानसावर उमटलेला आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श नवीन पिढीसमोर राहावा आणि त्यांच्या आठवणी चिरंतन राहाव्यात, या उद्देशाने शहरातील मुख्य रस्त्यांचे नामकरण या थोर व्यक्तिमत्त्वांच्या नावाने करणे गरजेचे असल्याचे महायुतीने म्हटले आहे.
यावेळी महायुतीच्या विविध शाखांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांच्या स्वाक्षऱ्या असलेले हे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले असून, आता महायुतीच्या या मागणीवर नगरपरिषद प्रशासन काय सकारात्मक निर्णय घेणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

