Sat. May 30th, 2026

प्रवरानगर:

डिजिटल युगात तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी वाचन संस्कृती कधीच थांबणार नाही, उलट ती नव्या माध्यमांतून अधिक सक्षम आणि व्यापक होईल, असा विश्वास अहिल्या नगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

प्रवरानगर येथील खासदार बाळासाहेब विखे पाटील बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम काळाची गरज असून समाजाने यात हिरहिरीने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी बोलताना शालिनीताई विखे यांनी जिल्ह्याला लाभलेल्या संत ज्ञानेश्वर, महिपती महाराज आणि निळोबारायांच्या समृद्ध आध्यात्मिक व साहित्यिक वारशाचा गौरव केला. हा वारसा जतन करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील ग्रंथालयांना मिळालेल्या कोट्यवधींच्या अनुदानाची आणि राहता व पाथर्डी येथे उभारल्या जाणाऱ्या आधुनिक डिजिटल उपकेंद्रांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी ग्रामीण भागातील वाचकांना दर्जेदार साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले.

प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. मगरे यांनी आपल्या भाषणात बदलत्या काळानुसार पारंपरिक ग्रंथालयांसोबतच डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला. या ग्रंथोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेली भव्य ग्रंथदिंडी आणि विविध नामांकित प्रकाशनांच्या पुस्तक प्रदर्शनाला विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वाचनालयांचा आणि सक्रिय ग्रंथवाचकांचा विशेष गौरव करण्यात आला. या सोहळ्याला सरपंच कल्पना मैड, सहायक ग्रंथ संचालक सचिन जोपुळे, साहित्यिक जयंत येलूलकर यांच्यासह शिक्षण व साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!