Sat. May 30th, 2026

संगमनेर:

‘हे करावंच लागेल’ अशी घोषणा देत मोठ्या गाजावाजासह सुरू करण्यात आलेल्या ‘संगमनेर २.०’ या मोहिमेला सोमवारी प्रारंभ झाला. मात्र, मोहिमेच्या पहिल्याच दिवशी संगमनेर नगर परिषदेने नेहमीप्रमाणे आपले ‘सॉफ्ट टार्गेट’ असलेल्या नवीन नगर रोडवरील हातगाड्यांवर कारवाईचा हातोडा चालवला. मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत पक्क्या अतिक्रमणांना मात्र फारसा धक्का लागला नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून संगमनेर नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमा केवळ फार्स ठरत आल्या आहेत. शहरातील गल्लीबोळातील गंभीर अतिक्रमणांकडे डोळेझाक करून केवळ नगर रोडवर कारवाईचे प्रदर्शन करणे हे पालिकेचे समीकरणच बनले आहे.

सोमवारी देखील बस स्थानकासमोरील पालिकेच्या गाळ्यांमधील पॅसेजमधील किरकोळ अतिक्रमणे हटवण्यात आली, परंतु तेथील ओटे आणि पायऱ्या काढण्याचे धाडस प्रशासनाने दाखवले नाही. याउलट, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून नागरिकांसाठी बसवण्यात आलेल्या ‘आय लव संगमनेर’ या दोन बाकड्यांवर मात्र जेसीबीचा पंजा पडला.

बहुचर्चित राजपाल कापड दुकान आणि मालपाणी हाऊस समोरील प्रवेशद्वाराच्या पक्क्या कामावर केवळ नाममात्र कारवाई करून पालिकेच्या पथकाने आपला मोर्चा वळवला. रस्त्यावरील फळविक्रेत्यांच्या हातगाड्या हटवल्यामुळे रस्ता मोकळा झाला असला, तरी त्या रिकाम्या जागेवर काही वेळातच अस्ताव्यस्त चारचाकी वाहने उभी राहिल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम राहिला. पक्की बांधकामे तशीच ठेवून केवळ छोट्या व्यावसायिकांवर कारवाई करणे हा प्रशासनाचा दुजाभाव असल्याची टीका आता संगमनेरकर करत आहेत.

शहरात सध्या प्रशासक राजवट असल्याने मुख्याधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच अधिकारी मनमानी करत असून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. शहराचा विकास साधायचा असेल तर केवळ रस्त्यावरील हातगाड्या हटवून चालणार नाही, तर प्रभाग निहाय नियुक्त केलेल्या ज्या अधिकाऱ्यांनी अवैध बांधकामांकडे दुर्लक्ष केले, त्यांच्यावरच आधी कारवाईची गरज आहे. जोपर्यंत प्रशासकीय यंत्रणेत सुधारणा होत नाही आणि पक्क्या अतिक्रमणांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत ‘संगमनेर २.०’ ही मोहीम यशस्वी होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!