संगमनेर (प्रतिनिधी):
संगमनेर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य पूर्णाकृती स्मारक उभारण्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. स्मारकाचे स्वरूप नेमके कसे असावे, याबाबत नागरिकांचे थेट मत जाणून घेण्यासाठी संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने ५ ते ७ मार्च या कालावधीत विशेष मतदान प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. सौ. मैथिलीताई तांबे यांनी दिली आहे.
या स्मारकासाठी आवश्यक जागा उपलब्ध व्हावी यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्य शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांतून बस स्थानकासमोरील १५ बाय १५ मीटरची जागा नगरपालिकेकडे वर्ग करण्यात आली असून, आता प्रत्यक्ष स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्मारकाच्या स्वरूपाबाबत शहरातील शिवप्रेमींमध्ये विविध मते असून काहींनी उभे स्मारक, काहींनी सिंहासनाधीश्वर तर काहींनी अश्वारूढ स्मारकाची मागणी केली आहे. नागरिकांच्या या भावनांचा आदर करत नगरपालिकेने लोकसहभागातून अंतिम निर्णय घेण्याचे ठरवले आहे.

या विशेष उपक्रमांतर्गत बस स्थानकावरील सुप्रीम पावभाजी समोर तीनही प्रकारच्या स्मारकांच्या संभाव्य ३डी प्रतिमा प्रदर्शनासाठी ठेवल्या जातील. संगमनेरकर नागरिक ५, ६ आणि ७ मार्च रोजी प्रत्यक्ष मतदानाद्वारे आपल्या पसंतीच्या स्मारकाची निवड करू शकणार आहेत.
या प्रक्रियेचा शुभारंभ गुरुवार, ५ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे आणि नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. शहराच्या अस्मितेशी जोडल्या गेलेल्या या उपक्रमात सर्व संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले मत नोंदवावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
