संगमनेर:
तालुक्यातील नागरिकांना आधार कार्डासंदर्भात येत असलेल्या विविध अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने गावोगावी आधार कॅम्प सुरू करावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने संगमनेरच्या नायब तहसीलदारांना नुकतेच निवेदन दिले.
गेल्या अनेक दिवसांपासून आधार कार्डातील दुरुस्ती आणि त्रुटींबाबत मनसेकडे तक्रारी प्राप्त होत आहेत. आधार कार्डमधील तांत्रिक चुकांमुळे शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि नवीन प्रवेश प्रक्रियेत मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. अनेकदा नागरिक आधार सेंटरवर जातात, परंतु तिथे कधी सर्व्हर बंद असतो तर कधी कर्मचारी उपलब्ध नसतात. यामुळे सर्वसामान्यांचा वेळ आणि पैसा वाया जात असून त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन संगमनेर तालुक्यात ठिकठिकाणी विशेष कॅम्प आयोजित करावेत, जेणेकरून नवीन आधार काढणे आणि जुन्या कार्डातील अपडेट्स सुलभ होतील, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन देताना मनसे उपजिल्हाध्यक्ष दीपक वर्पे, तालुकाध्यक्ष राहुल पानसरे, उपाध्यक्ष संजय शिंदे, बजरंग घुले, ऋषिकेश गिरी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

