Sat. May 30th, 2026

अहिल्यानगर :

अहिल्यानगर जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध गुटखा विक्रीच्या काळ्या व्यवसायाला पोलीस प्रशासनातीलच काही बड्या माशांचे अभय असल्याचे अखेर उघड झाले आहे. आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत पुराव्यानिशी या भ्रष्ट साखळीचा पर्दाफाश केल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार हृदय घोडके आणि अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील शंकर चौधरी या दोघांचीही तातडीने पोलीस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील भ्रष्ट ‘सिस्टीम’चे धाबे दणाणले असून पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात परराज्यातून येणाऱ्या गुटख्याचा महापूर आला असून, हा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू ठेवण्यासाठी ‘सिस्टीम’च्या नावाने दरमहा सुमारे ९० लाख रुपयांची वसुली केली जात असल्याचा खळबळजनक आरोप आमदार अमोल खताळ यांनी केला होता. केवळ आरोपच नव्हे, तर या वसुलीमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे त्यांनी विधानसभेच्या पटलावर घेतली होती.

खताळ यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आश्वासन दिले होते. मात्र, चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा होत असल्याचे लक्षात येताच खताळ यांनी आपला पाठपुरावा अधिक तीव्र केला होता, यामुळे प्रशासनाला अखेर हालचाल करावी लागली.

काही पोलीस कर्मचारी हे थेट गुटखा माफियांच्या संपर्कात असून त्यांना गुन्हे लपवण्यासाठी मदत करत आहेत, ही बाब आता चौकशीच्या फेऱ्यात आली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या दोन्ही अंमलदारांची बदली करण्याचे आदेश काढले असून, त्यांच्यावर असलेल्या गंभीर आरोपांची आता सखोल विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पोलीस दलातील त्या विशिष्ट गटाला मोठा धक्का बसला आहे, जो वर्षानुवर्षे गुन्हेगारांशी हातमिळवणी करून आपली पोळी भाजून घेत होता.

यापूर्वी अमली पदार्थ विक्री प्रकरणात श्यामसुंदर गुजर या अंमलदाराला बडतर्फ करण्यात आले होते, त्याच धर्तीवर आता घोडके आणि चौधरी यांच्यावरही कडक कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा एकदा हा मुद्दा गाजण्याची शक्यता निर्माण झाल्याने, त्यापूर्वीच प्रशासनाने ही कारवाई करून आपली पाठ वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.

आमदार अमोल खताळ यांनी मांडलेली ही भूमिका जिल्ह्याची तरुण पिढी उद्ध्वस्त करणाऱ्या गुटखा माफियांना मिळणारे राजकीय आणि प्रशासकीय कवच फोडणारी ठरते का हे येत्या काळात स्पष्ट होईल.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!