संगमनेर:
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त संगमनेर शहरात काल निघालेली पारंपारिक मिरवणूक म्हणजे केवळ एक सोहळा नसून, ते संगमनेरकरांच्या अखंडतेचे आणि अलोट प्रेमाचे प्रतीक ठरले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि शिवजयंती उत्सव युवक समितीच्या वतीने आयोजित या भव्य मिरवणुकीने शहराच्या एकतेचा एक नवा आणि आदर्श वस्तुपाठ घालून दिला असल्याची भावना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी आणि शहर प्रमुख अमित चव्हाण यांनी व्यक्त केली.
या ऐतिहासिक मिरवणुकीच्या महाआरतीचे मानकरी राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे ठरले. त्यांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा अधिकच वाढली.


यावेळी व्यासपीठावर आणि मिरवणुकीत शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील, कोपरगाव तालुका प्रमुख भरत मोरे, शिवजयंती उत्सव युवक समितीचे अध्यक्ष विनायक गरुडकर, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी, शिवज्योत प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सदस्य, तसेच शिवसेना महिला आघाडी आणि सर्वपक्षीय शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभूतपूर्व सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जात-पात आणि सर्व राजकीय मतभेद विसरून हजारो शिवभक्त या मिरवणुकीत खांद्याला खांदा लावून सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या कडकडाटात आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या गगनभेदी जयघोषात अवघे संगमनेर शहर शिवमय झाले होते. संपूर्ण मिरवणुकीदरम्यान संगमनेरकरांनी दाखवलेला शिस्तबद्ध सहभाग आणि अभूतपूर्व प्रतिसाद खरोखरच कौतुकास्पद ठरला.
या यशस्वी आयोजनाबद्दल शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी आणि उत्सव समितीने सर्व संगमनेरकरांचे मनापासून आभार मानले आहेत.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, शहरप्रमुख अमित चव्हाण, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, शिवसेना उबाठा शिवजयंती उत्सव अध्यक्ष अमोल डुकरे, तसेच सर्व नगरसेवक, संगमनेर सेवा समितीचे पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिकांनी उपस्थित राहून सर्व शिवभक्तांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.
