Wed. Apr 1st, 2026

संगमनेर:

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेल्या संगमनेरमध्ये आता आधुनिक सुरक्षेचे नवे पर्व सुरू झाले आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून आणि संगमनेर नगरपरिषदेच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील अशा प्रकारचा पहिलाच ‘रक्षक दल’ प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.

महिला, मुली आणि सर्वसामान्य नागरिकांच्या तात्काळ सुरक्षेसाठी हे दल चोवीस तास सेवेसाठी सज्ज झाले असून, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे या दलाचा भव्य शुभारंभ करण्यात आला.

शहरातील शांतता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणेला पूरक म्हणून हे रक्षक दल कार्य करणार आहे. शहरात कुठेही अनुचित घटना घडल्यास किंवा मदतीची गरज भासल्यास नागरिकांनी ९०६७२७३२७३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी आयडीबीआय बँकेने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून एक चारचाकी वाहन आणि दोन बुलेट गाड्या उपलब्ध करून दिल्या असून, त्याद्वारे जवान शहराच्या कानाकोपऱ्यात गस्त घालणार आहेत.

एखाद्या नगरपरिषदेने अशा प्रकारचे सुरक्षा दल स्थापन करण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ असून, हे दल महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या समाजकंटकांसाठी जरब ठरेल, असा विश्वास आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला.

नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांनी नागरिकांची सुरक्षितता हीच आपली सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगत संगमनेरला अधिक सुरक्षित आणि प्रगत बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. विशेष म्हणजे, या उपक्रमाचे सामर्थ्य दाखवण्यासाठी शहरातून काढण्यात आलेल्या भव्य रॅलीचे नेतृत्व स्वतः नगराध्यक्षांनी रक्षक दलाचे वाहन चालवून केले, जे संपूर्ण शहरासाठी आकर्षणाचे केंद्र ठरले.

या सोहळ्याला माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!