संगमनेर:
मक्याच्या उधारीपोटी दिलेला ७ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश न वटल्याच्या कारणावरून दाखल करण्यात आलेल्या खटल्यात संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
वावी (ता. सिन्नर) येथील महावीर ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर मिलिंद रमेश गंगवाल यांनी कोपरगाव तालुक्यातील डांगेवाडी येथील नितीन माधव कांडेकर आणि नारायण माधव कांडेकर यांच्याविरुद्ध ही तक्रार दाखल केली होती. मात्र, प्रत्यक्ष न्यायालयीन सुनावणीदरम्यान फिर्यादी पक्ष आपला दावा कायदेशीररीत्या सिद्ध करण्यात अपयशी ठरला.
फिर्यादीनुसार, आरोपींनी पोल्ट्री व्यवसायासाठी घेतलेल्या मक्याच्या उधारीपोटी नोव्हेंबर २०१९ मध्ये हा धनादेश दिला होता, जो ‘अकाउंट ब्लॉक्ड’ या कारणाने परत आला. मात्र, आरोपींच्या वकिलांनी हा दावा खोडून काढताना न्यायालयात सादर केले की, आरोपींनी २०१६-१७ सालापर्यंत फिर्यादीच्या दुसऱ्या एका फर्मच्या खात्यात १० लाख ८४ हजार रुपयांहून अधिक रक्कम नेट बँकिंगद्वारे आधीच जमा केली होती. याशिवाय, २०१६ सालची बिले आणि धनादेशाची रक्कम यामध्ये मोठी तफावत असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.


या प्रकरणाच्या सुनावणीत अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर आल्या. फिर्यादीने सादर केलेल्या बँक मेमोवर सुरुवातीला कोणत्याही अधिकृत स्वाक्षरी किंवा शिक्का नसल्याचे न्यायालयाने नोंदवले. तसेच ज्या पोल्ट्रीच्या नावे बिले फाडण्यात आली होती, त्याचे ठिकाण आणि आरोपींच्या पोल्ट्रीचे प्रत्यक्ष ठिकाण यातही तफावत आढळली.
विशेष म्हणजे, आरोपींचा पोल्ट्री व्यवसाय २०१७ मध्येच बंद झाला असताना २०२० मध्ये हा धनादेश नेमका कशासाठी देण्यात आला, याचे समाधानकारक स्पष्टीकरण फिर्यादी देऊ शकले नाहीत. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. भेंडे यांनी फिर्यादीचा दावा संशयास्पद ठरवत सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या निकालांचा आधार घेत आरोपींची कलम १३८ च्या गुन्ह्यातून मुक्तता केली. या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. सागर एस. दुशिंग यांनी प्रभावी कायदेशीर बाजू मांडली.
