Wed. Apr 1st, 2026

महासंगम न्यूज ऑनलाईन

गणोरे:

नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालात संगमनेर आणि अकोले तालुक्यातील तरुणांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. यामध्ये गणोरे गावच्या दोन सुपुत्रांनी एकाच वेळी पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालून गावाची मान अभिमानाने उंचावली आहे.

अविनाश बाळासाहेब आंबरे आणि निलेश शांताराम आंबरे या दोन तरुणांच्या यशाने पूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून, दोन्ही कुटुंबांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. गणोरे गावात गेल्या काही काळापासून प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे आणि अविनाश व निलेश यांच्यासारख्या आदर्श तरुणांनी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवून दाखवले आहे.

अविनाश आंबरे यांचे प्राथमिक शिक्षण गावातील छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे झाले, तर त्यांनी मुंबई येथून बी.टेक (विद्युत अभियांत्रिकी) ही उच्च पदवी संपादन केली. अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे आलेल्या अविनाश यांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी खासगी कोचिंग क्लासेसमध्ये नोकरी करत जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला. त्यांचे वडील बाळासाहेब आंबरे यांनी गावात ‘अविनाश कृषी सेवा केंद्र’ चालवून मुलाच्या शिक्षणासाठी कष्ट घेतले, तर आई सीमा यांनी त्यांना खंबीर पाठबळ दिले.

अविनाश आंबरे यांचे गावात आगमन होताच ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ‘आपुलकी फाउंडेशन’च्या वतीने संस्थेचे अध्यक्ष दीपकशेठ वर्पे यांनी अविनाश यांचा विशेष सत्कार केला. यावेळी बोलताना वर्पे म्हणाले की, गावात अधिकाऱ्यांची रांग लागणे ही अभिमानास्पद बाब असून अशा कष्टाळू तरुणांमुळेच पुढच्या पिढीला नवी दिशा मिळत आहे. दुसरीकडे, निलेश शांताराम आंबरे यांच्या स्वागतासाठीही गावकरी आतुर झाले आहेत.

या गौरव सोहळ्याप्रसंगी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब घोसाळे, सुभाष जयराम आहेर, सतीश आंबरे, सोमनाथ आहेर, ह.भ.प. अण्णासाहेब दातीर, लक्ष्मण मोरे, बादशहा आंबरे, जालिंदर आंबरे, संजय भाऊसाहेब दातीर, जालिंदर वर्पे आणि गोरख आहेर यांसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!