अहिल्यानगर:
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या भीषण ॲसिड हल्ल्याला १५ दिवस उलटूनही मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट असून, तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर, आरोपीची माहिती देणाऱ्या व्यक्तीस अहिल्यानगर पोलिसांनी २ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले असून माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णतः गुप्त ठेवले जाणार आहे.
पंधरा दिवसांपूर्वी शाळेतून घरी परतत असताना एका अज्ञात इसमाने या मुलीवर अचानक ॲसिड फेकून पलायन केले होते. या हल्ल्यात गंभीर भाजलेल्या मुलीवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे गांभीर्य ओळखून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. दरम्यान, घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने आणि कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा उपलब्ध नसल्याने तपासात अडथळे येत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेने पीडित मुलीने सांगितलेल्या वर्णनावरून संशयित आरोपीचे रेखाचित्र (स्केच) प्रसिद्ध केले असून ते सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत अनेक संशयितांची चौकशी केली असून, तपास पथके दिवसरात्र काम करत आहेत.
नागरिकांना या रेखाचित्रातील व्यक्तीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या ९८२३२५६९४९ किंवा ८२०८४४६२९३ या क्रमांकावर तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


