संगमनेर:
संगमनेर शहरात अवैध कत्तलखान्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) आपली धडक मोहीम कायम ठेवली असून, सोमवारी जमजम कॉलनी भागात केलेल्या कारवाईत ९५० किलो गोमांस जप्त केले आहे. या कारवाईत पोलिसांनी मांस आणि कत्तलीचे साहित्य असा एकूण २ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
या प्रकरणी नवाज जावेद कुरेशी, समद जावेद आणि नावेद जावेद कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी सध्या फरार आहेत.
विशेष म्हणजे, एलसीबीने गेल्या एकाच आठवड्यात संगमनेरमध्ये केलेली ही चौथी मोठी कारवाई असून आतापर्यंत २० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अहिल्यानगरहून येऊन वारंवार यशस्वी कारवाया करत असताना, स्थानिक संगमनेर पोलिसांना मात्र या अवैध धंद्यांची माहिती कशी मिळत नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. एलसीबीच्या या सक्रियतेमुळे शहरातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असले तरी, स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर आणि कार्यक्षमतेवर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


