Sat. May 30th, 2026

संगमनेर:

काकडी परिसरात झालेल्या गांजा तस्करी प्रकरणातील आरोपी प्रथमेश सुरेश गोलवड याला संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन नाकारला आहे. करिअरचे कारण देऊन जामिनासाठी प्रयत्न करणाऱ्या आरोपीला न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता कोठडीतच राहावे लागणार आहे.

१ मार्च २०२६ रोजी पोलिसांनी एका कारचा पाठलाग करून काकडी परिसरातून २१ किलो ४९० ग्रॅम गांजा जप्त केला होता. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

आरोपीच्या वतीने न्यायालयात असा युक्तिवाद करण्यात आला होता की, तो बारावीचा विद्यार्थी असून त्याचे करिअर धोक्यात येईल. तसेच संबंधित कार त्याची नसल्याने त्याला त्यातील अमली पदार्थांची माहिती नव्हती आणि पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाचे वजनही चुकीच्या पद्धतीने मोजल्याचा दावा वकिलामार्फत करण्यात आला.

मात्र, सरकारी वकिलांनी या जामीन अर्जाला कडाडून विरोध केला. आरोपीने संगनमताने हा गंभीर गुन्हा केला असून यातील इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. शेख यांनी आरोपीचा जामीन फेटाळून लावला. जप्त करण्यात आलेला गांजा हा व्यावसायिक स्वरूपाचा असल्याने व तपासादरम्यान आरोपीने गांजा विक्रीची कबुली दिली असून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता त्याला जामीन देणे योग्य ठरणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने आपल्या आदेशात नोंदवले आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!