Fri. May 29th, 2026

संगमनेर:

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त आयोजित गोदा ते नर्मदा जलयात्रा शनिवारी रात्री संगमनेरमध्ये आली असताना एका वादाची घटना समोर आली आहे.

प्रवरा नदीकाठावरील जाजू इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर ही दिंडी विसावली असताना, दुचाकीवरून ट्रिपल सीट आलेल्या भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार केवळ निमंत्रितांच्या वाहनांना प्रवेश दिला जात असताना, या तरुणांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याशी उद्धट वर्तन करून शिवीगाळ केली.

या गोंधळादरम्यान संबंधित तरुणांनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी त्यांची पिवळ्या रंगाची वेस्पा स्कूटर जप्त केली होती, मात्र कार्यक्रम संपल्यानंतर हँडल लॉक नसल्याचा फायदा घेत संबंधित तरुण आपली दुचाकी तेथून घेऊन गेले.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक उपस्थित असतानाही सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या या अरेरावीची शहरभर चर्चा सुरू आहे. याप्रकरणी आता संगमनेर पोलीस संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!