Fri. May 29th, 2026

राहता:

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारात बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान करणाऱ्या एका मोठ्या टोळीला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि लोणी पोलिसांनी संयुक्तपणे राबविलेल्या या धाडसी मोहिमेत एका बीएएमएस डॉक्टरसह नऊ जणांना अटक करण्यात आली असून, २४ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पिंपरी निर्मळ येथील एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. या कारवाईसाठी पोलिसांनी वैद्यकीय पथकाची मदत घेत एका बनावट महिला ग्राहकाद्वारे सापळा रचला होता. छाप्यादरम्यान नेवासा येथील डॉ. राहुल आबासाहेब भनगे आणि त्याचा साथीदार अभिजीत दिलीप भुसाळ हे पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या साह्याने गर्भलिंग तपासणी करत असल्याचे उघड झाले. हे आरोपी प्रत्येक महिलेकडून १० हजार रुपये उकळत होते.

विशेष म्हणजे, या ठिकाणी बीड, नाशिक, पुणे आणि संगमनेर यांसारख्या शहरांतून अनेक गरोदर महिला तपासणीसाठी आल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळावरून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, रोख रक्कम आणि तीन आलिशान कार जप्त केल्या आहेत.

या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून अवैध कृत्ये करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!