Sat. May 30th, 2026

महासंगम न्यूज ऑनलाईन

संगमनेर: संगमनेर शहर पोलिसांनी शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला शस्त्रांसह पकडून एक मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी (२३ ऑक्टोबर) मध्यरात्री करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना जेरबंद केले असून, एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. आरोपींकडून दरोड्यासाठी वापरली जाणारी प्राणघातक शस्त्रे, दोन मोटारसायकली आणि मोबाईल फोनसह एकूण १ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे व पथकाने ही कारवाई केली. मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास घुलेवाडी शिवारातील हरीबाबा मंदिराजवळ गस्त घालत असताना पथकाला पाच संशयित व्यक्ती आढळून आले. पोलिसांनी निखील विजय वाल्हेकर (२४), अनिकेत गजानन मंडलिक (२३), मोहन विजय खरात (१९) आणि आदित्य संजय शिंदे (१९) यांना पकडले, तर साई शरद सुर्यवंशी हा पळून गेला.

पोलिसांच्या चौकशीत हे सर्व जण दरोड्याच्या तयारीत असल्याचे उघड झाले. त्यांच्याकडून ४ मोबाईल (किंमत ८५,०००/-), एक फॅशन प्रो मोटार सायकल (किंमत ४०,०००/-), एक ज्युपीटर स्कुटी (किंमत ३५,०००/-), एक एअर पिस्तूल, कोयता, कटर, हातोडा, कटावणी, पहार, लोखंडी गज, दोरी आणि मिरचीची भुकटी असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

या टोळीतील पकडलेल्या व फरार आरोपींवर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. निखिल वाल्हेकरवर सहा, अनिकेत मंडलिकवर दहा आणि फरार साई सूर्यवंशीवर नऊ गंभीर गुन्हे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नोंद आहेत. पकडलेल्या चार आरोपींना संगमनेर न्यायालयाने २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कॉन्स्टेबल विजय खुळे यांच्या फिर्यादीवरून पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक इमरान खान पुढील तपास करत आहेत.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!