संगमनेर:
संगमनेरसह अहिल्यानगर आणि नाशिक जिल्हा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिअर बार आणि हॉटेल्सचे कुलूप तोडून चोऱ्या करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या टोळीतील पाच आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ५ लाख ५५ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे एकूण पाच मोठे गुन्हे उघडकीस आले आहेत.
घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंदरमाळवाडी येथील ‘हॉटेल निलायम बार’मधून ३ लाख ६ हजार रुपयांची विदेशी दारू, सिगारेट आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरीला गेला होता. या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे नाशिकच्या वडाळा परिसरातून हसन हमजा कुट्टी, आकाश सचिन सूर्यवंशी आणि मेहताब गुलाम रसूल अन्सारी (मूळ रा. झारखंड) या तीन मुख्य संशयितांना ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी आपला फरार साथीदार बंटी दास याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. तसेच हा चोरीचा माल नाशिकमधील पळसे येथील ‘हॉटेल लकी बार’चे चालक किरण रामदास उगले आणि विवेक अरुण उगले यांना विकल्याचे सांगितले. विवेक उगले याने चोरीसाठी वाहन पुरवले होते, तर पोलिसांनी किरण उगले याला तत्परतेने अटक केली आहे.
अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी विविध कंपन्यांची विदेशी दारू, गुन्ह्यात वापरलेली टाटा इंडिका कार, कटर, मंकी मास्क, एअर पिस्टल आणि स्क्रू ड्रायव्हर असा एकूण ५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या टोळीने अहिल्यानगर आणि नाशिक परिसरात केलेल्या चोऱ्यांचे गुन्हे उघड झाले असून, यामध्ये संगमनेर तालुका पोलीस ठाण्यांतर्गत दोन, वावी आणि पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावेश आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींना घारगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
