Fri. Jun 19th, 2026

संगमनेर:

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक-शिर्डी-अहिल्यानगर मार्गे नेण्याची घोषणा केल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या निर्णयावर विधान परिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी कडाडून टीका केली असून, रेल्वेमंत्र्यांना नफा-तोट्यापलीकडचे अर्थकारण समजत नसल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

हा निर्णय म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या विकासावर घाला घालणारा असून, सरळ व सोपा प्रकल्प जाणीवपूर्वक गुंतागुंतीचा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्ग हा केवळ नाशिक किंवा अहिल्यानगरसाठीच नव्हे, तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड आणि मार्गावरील अनेक ग्रामीण भागाच्या विकासासाठी जीवनदायी ठरणारा प्रकल्प आहे.

या रेल्वेमुळे पुण्यावरील वाहतुकीचा आणि लोकसंख्येचा ताण कमी होण्यास मोठी मदत होणार होती. मुंबई आणि पुण्याच्या जवळ असूनही नाशिकला अपेक्षित औद्योगिक व आयटी विकास साधता आलेला नाही, त्यामुळे उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणे गरजेचे आहे. या निर्णयामागे काही राजकारण किंवा षडयंत्र आहे का, असा सवाल करत आमदार तांबे यांनी सिन्नर, संगमनेर, अकोले, जुन्नर आणि खेडसह संपूर्ण मार्गावरील नागरिकांना या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारण्याचे आवाहन केले आहे.

रेल्वे प्रकल्प हा पुढील शंभर वर्षांचा दृष्टिकोन ठेवून आखला जातो, त्यामुळे आज जर जनतेच्या तोंडचा घास हिरावला गेला तर येणाऱ्या पिढ्या सरकारला माफ करणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी या विषयावर तज्ज्ञ समिती नेमून मध्यम मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आगामी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची वैयक्तिक भेट घेऊन या विषयात लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले.

तसेच सत्ताधारी पक्षाच्या आमदार आणि खासदारांनीही पक्षीय दबाव झुगारून जनतेच्या हितासाठी या लढ्यात एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!