संगमनेर:
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी संगमनेरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या ७ पदाधिकाऱ्यांसह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खासदार वाकचौरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्याचा आरोप करत उबाठा गटाच्या शिवसैनिकांनी बुधवारी जुन्या पुणे-नाशिक महामार्गावरील बसस्थानकासमोर तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी रस्त्यावर वाकचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन सार्वजनिक शांततेचा भंग झाला होता.
या बेकायदेशीर कृत्याबद्दल पोलीस हवालदार संजय बढे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
यामध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, शहर प्रमुख अमित चव्हाण, फैसल सय्यद, भीमाशंकर पावसे, अमोल डुकरे, आसिफ तांबोळी आणि त्रिलोक कतारी यांच्यासह इतर ५ ते १० आंदोलकांचा समावेश आहे. दरम्यान, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल दहातोंडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
