अकोले: बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या अवघ्या २२ वर्षीय विवाहितेचा सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अकोले शहरात घडली आहे. रुपाली विठ्ठल गोधडे (रा. आश्वी खुर्द, संगमनेर) असे मृत मातेचे नाव आहे. या घटनेमुळे नवजात बाळ सुखरूप असले तरी, प्रसूतीच्या आनंदाऐवजी आदिवासी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
रुपाली यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून बाळ सुखरूप जन्माला घातले. मात्र, त्यानंतर रुपाली यांची प्रकृती अचानक खालावली. प्रकृती अत्यंत गंभीर बनल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालय (लोणी) येथे हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, लोणी येथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी रुपाली यांना मृत घोषित केले.
रुपाली यांच्या मृत्यूमुळे सासर आणि माहेरच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. नातेवाईकांनी खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांवर ‘उपचारांत घोर हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा’ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. “वेळेवर आणि योग्य उपचार न मिळाल्यानेच रुपालीचा मृत्यू झाला,” असे त्यांचे म्हणणे आहे.
अत्यंत गरीब आदिवासी समाजातील या कुटुंबावर कर्त्या महिलेचा मृत्यू झाल्याने एका बाजूला नवजात बाळाच्या जन्माचा आनंद, तर दुसऱ्या बाजूला आईच्या निधनाचे दु:ख अशी भीषण परिस्थिती ओढवली आहे. नातेवाईकांच्या गंभीर आरोपांमुळे, आता आरोग्य विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
