घारगाव –
घारगाव येथील पश्चिम भागात असलेल्या एका निवासी घरावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत लाखोंची लूट केली आहे. ७ जानेवारी ते १६ जानेवारी या नऊ दिवसांच्या कालावधीत फिर्यादी महिला घरी नसताना ही चोरी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी अप्सरा मोहम्मद शेख यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजासह आतील किचन ट्रॉल्या आणि बेडरूममधील लाकडी कपाटही उचकटले. फिर्यादी महिला १७ जानेवारी रोजी सकाळी घरी आल्यावर त्यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला, आत जाऊन पाहिले असता सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते आणि कपाटातील रोख रक्कम व दागिने गायब होते.
विशेष म्हणजे, चोरट्यांनी कपाटातील ५०० आणि १०० रुपयांच्या नोटांचे बंडल लंपास केले असून दागिन्यांमध्ये प्रामुख्याने सोन्याच्या अंगठ्या आणि मिनी गंठण यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
