Sat. May 30th, 2026

संगमनेर (प्रतिनिधी):

तालुक्यातील खळी परिसरात शेतीच्या वादाने टोकाचे वळण घेतले असून, एका कुटुंबाने दुसऱ्याच्या उभ्या मका पिकात ट्रॅक्टर घालून पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर, भरदिवसा कट्टा लावून “तुला संपवून टाकू” अशी धमकी दिल्याने परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​फिर्यादी किशोर दादू वाघमारे (रा. खळी) आणि त्यांच्याच कुटुंबातील काही सदस्यांमध्ये शेतीच्या वाटणीवरून गेल्या काही दिवसांपासून न्यायालयात वाद सुरू आहेत. ९ जानेवारी २०२६ रोजी किशोर वाघमारे हे त्यांच्या आजारी आईला भेटण्यासाठी लोणी येथील रुग्णालयात गेले होते. हीच संधी साधून आरोपींनी मुंबईहून थेट खळी गाठले. त्यांनी गट क्र. १५ व १६ मधील उभ्या मका पिकात ट्रॅक्टर घालून संपूर्ण पिकाची नांगरणी करत मोठे आर्थिक नुकसान केले.

​पिकाचे नुकसान होत असल्याचे पाहून फिर्यादी तातडीने घटनास्थळी पोहोचले. यावेळी आरोपींनी त्यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादादरम्यान आरोपी महेश वाघमारे याने त्याच्या कमरेला असलेला कट्टा फिर्यादीला लावून, “तू मुंबईला दिसलास तर तुला कायमचा संपवून टाकू,” अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली. याशिवाय आरोपींनी फिर्यादीच्या संस्थेच्या कार्यालयाचीही तोडफोड करत साहित्याचे नुकसान केले.

​या प्रकरणी आश्वी पोलिसांनी गंभीर दखल घेत अविनाश रामदास वाघमारे, महेश रामदास वाघमारे, सुमन रामदास वाघमारे आणि ज्योत्स्ना राजेंद्र जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. शेतीच्या वादातून शस्त्राचा वापर आणि उघडपणे दिलेल्या धमकीमुळे खळी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!