Sat. May 30th, 2026

संगमनेर –

संगमनेर शहरात अवैध कत्तलखान्यांनी कायद्याची भीती गुंडाळून ठेवल्याचे चित्र असतानाच, पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी केलेल्या धडाकेबाज कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. एलसीबी आणि पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने शुक्रवारी केलेल्या ३३ लाखांच्या कारवाईची शाई वाळते ना वाळते, तोच शनिवारी २४ जानेवारी रोजी संगमनेर शहर पोलिसांनी जमजम कॉलनी परिसरात दोन वेगवेगळ्या कारवाया करत सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत १००० किलो गोमांस जप्त करण्यात आले असून १० जिवंत गोवंशांचे प्राण वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे.

शहरातील अनियंत्रित कत्तलखाने बंद करण्याचे धाडस स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस आणि पालिका प्रशासनाने दाखवावे, अशी मागणी जोर धरत असतानाच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीने या रॅकेटचा पर्दाफाश केला. २४ जानेवारी २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जमजम कॉलनीतील गल्ली नंबर ७ मध्ये छापा टाकला असता, पोलिसांना तब्बल १ हजार किलो गोमांस आढळून आले, ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ३ लाख रुपये आहे. या प्रकरणी समद जावेद कुरेशी आणि नवाज जावेद कुरेशी या दोन्ही संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

केवळ मांस जप्तीवरच न थांबता पोलिसांनी त्याच दिवशी सकाळी १० वाजेच्या सुमारास कोल्हेवाडी रोडवरील जमजम कॉलनी परिसरात दुसरी मोठी कारवाई केली. या ठिकाणी कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत निर्दयपणे, चारा-पाण्याविना बांधून ठेवलेल्या १० जिवंत जनावरांची पोलिसांनी सुटका केली. या दोन लाख रुपये किमतीच्या गोवंशांना तातडीने सायंखिडी येथील जीवदया गोशाळेत सुरक्षित हलवण्यात आले आहे. सलग दोन दिवस झालेल्या या कारवायांनी संगमनेरमधील अवैध गोवंश हत्येचे मोठे अर्थकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

ही यशस्वी मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे, पोलीस कर्मचारी बाबासाहेब सातपुते, विजय खुळे, राहुल पांडे, राहुल क्षीरसागर, विशाल कर्पे, बापुसाहेब हांडे, राहुल सारबंदे आणि सुनील ढाकणे यांच्या पथकाने फत्ते केली.

पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र सहाणे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आता या छुप्या कत्तलखान्यांच्या मास्टरमाइंडपर्यंत पोलीस पोहोचणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सातत्याने होणाऱ्या कारवाईनंतर देखील कत्तलखाने सुरूच असल्याने यामागील हप्तेखोरीमध्ये कोणाकोणाचे हात बरबटले आहेत, याची चर्चा आता शहरात रंगली आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!