शिर्डी:
तीर्थक्षेत्र शिर्डी शहरात अनैतिक मानवी व्यापार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि कठोर कारवाई केली आहे. पिंपळवाडी रोडवरील ‘हॉटेल साई सहारा’ येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींवर पोलिसांनी आता भारतीय न्याय संहितेचे (BNS) कलम १११ म्हणजेच ‘संघटित गुन्हेगारी’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी हे कडक कलम लावण्याची ही पहिलीच वेळ असून, यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

नोव्हेंबर २०२५ मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिर्डी पोलिसांनी हॉटेल साई सहारावर छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी अमोल भिमा भोसले आणि गणेश सिताराम कानडे या दोन मुख्य सुत्रधारांना अटक करून तीन पीडित महिलांची मुक्तता केली होती.
सुरुवातीला या आरोपींवर केवळ ‘पिटा’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र सखोल तपासात हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. अमोल भोसले याच्यावर यापूर्वी दोन, तर गणेश कानडे याच्यावर चार गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि आर्थिक फायद्यासाठी त्यांनी निर्माण केलेली ही साखळी लक्षात घेऊन, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी या प्रकरणात कलम १११ वाढीव लावण्याचा प्रस्ताव दिला होता, ज्याला वरिष्ठ कार्यालयाने मंजुरी दिली. नवीन कायद्यानुसार, दोन किंवा अधिक व्यक्तींनी संघटित होऊन वारंवार गुन्हे केल्यास तो संघटित गुन्हेगारीचा प्रकार मानला जातो.
या कलमाची व्याप्ती ‘मोक्का’ कायद्यासारखीच अत्यंत कडक असून, यामुळे आरोपींना आता सहजासहजी जामीन मिळणार नाही. कायदेतज्ज्ञांच्या मते, या कलमामुळे आरोपींचा जामीन किमान वर्षभरासाठी लांबणीवर पडू शकतो आणि दोषसिद्ध झाल्यास त्यांना जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सुरू असलेले हे अवैध धंदे मुळासकट उपटून टाकण्यासाठी पोलिसांनी उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
