संगमनेर :
संगमनेरमधील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असताना, आता कामाची प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यावर काही जणांकडून श्रेय घेण्याची धडपड सुरू झाली आहे. अनेक वर्षे सत्ता हातात असताना ज्यांना पोलीस वसाहतीची आठवण झाली नाही, त्यांना आताच याचा कळवळा कसा आला, असा घणाघाती टोला आमदार अमोल खताळ यांनी विरोधकांना लगावला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना आमदार खताळ म्हणाले की, संगमनेर शहर पोलीस ठाण्याशी संलग्न असलेली ३ अधिकारी व ६५ कर्मचाऱ्यांची निवासस्थाने १९६० च्या दशकातील असून ती अत्यंत जीर्ण झाली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही घरे राहण्यास अयोग्य असल्याचे लेखी कळवूनही यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले. पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरणे, नादुरुस्त गटारी आणि शौचालयांचे प्रश्न यामुळे पोलीस कुटुंबीयांचे हाल होत होते.

या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून आमदार खताळ यांनी मागील अधिवेशनात विधानसभेत आवाज उठवला होता. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. या प्रयत्नांमुळेच आता जुन्या व धोकादायक इमारती पाडून त्या ठिकाणी अद्ययावत, सुरक्षित व आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त नवीन पोलीस निवासस्थाने आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र अधिकृत निवासस्थान बांधण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या पोलिसांना सुरक्षित निवासस्थान मिळणे हा मुद्दा श्रेयाचा नसून कर्तव्याचा आहे. त्यामुळे कोण श्रेय घेतो यापेक्षा महायुती सरकारच्या काळात हा प्रश्न प्रत्यक्षात मार्गी लागत असल्याचा सार्थ अभिमान असल्याचेही आमदार खताळ यांनी यावेळी स्पष्ट केले.
