Sat. May 30th, 2026

मुंबई:

संगमनेर आणि सिन्नर मतदारसंघातील आरोग्य सुविधांच्या प्रलंबित प्रश्नांवर आमदार सत्यजीत तांबे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, आज त्यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन प्रशासकीय विलंबाबाबत पाठपुरावा केला. सिन्नर-वावी ग्रामीण रुग्णालयातील ट्रॉमा सेंटर, स्वतंत्र महिला रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या कामात होणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याची मागणी तांबे यांनी यावेळी लावून धरली.

आमदार तांबे यांनी प्रामुख्याने सिन्नर-वावी येथील ट्रॉमा सेंटरचा मुद्दा उपस्थित केला. फेब्रुवारी २०२४ मध्ये मंजुरी मिळूनही या सेंटरचे काम अद्याप सुरू न झाल्याने अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार मिळत नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जुलै २०२३ पासून सातत्याने अधिवेशनात हा प्रश्न मांडूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

यासोबतच, २०२० पासून संगमनेरमध्ये मंजूर असलेल्या स्वतंत्र महिला रुग्णालयाचे काम आणि खांडगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा रखडलेला प्रश्नही त्यांनी मंत्र्यांसमोर मांडला. ग्रामीण भागातील महिला आणि ज्येष्ठांच्या सोयीसाठी हे प्रकल्प तातडीने पूर्ण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या बैठकीत महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्वसामान्यांना रुग्णालयात येणाऱ्या अडचणी दूर करून योजनेचा लाभ सुलभरीत्या मिळावा, अशी आग्रही मागणी तांबे यांनी केली.

या सर्व मागण्यांची दखल घेत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, या प्रकरणांवर तातडीने प्रशासकीय कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. जोपर्यंत नागरिकांचे आरोग्य प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहील, असा विश्वास आमदार सत्यजीत तांबे यांनी यावेळी व्यक्त केला.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!